जिल्हा परिषदेच्या त्या शिक्षकाचे तडकाफडकी निलंबन
जिल्हा परिषदेच्या त्या शिक्षकाचे तडकाफडकी निलंबन
मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी काढले आदेश
पौक्सो कायद्याअंतर्गत झाला होता गुन्हा दाखल
मानवत प्रतिनिधी
इयत्ता आठवीच्या अल्पवयीन विद्यार्थी व विद्यार्थिनीं समोर अश्लील भाषेत शब्द उच्चारून व विनाकारण छडीने मारहाण करणाऱ्या मानवत येथील जिल्हा परिषद प्रशालेच्या त्या प्राथमिक पदवीधर शिक्षका विरुद्ध जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी नतीशा माथूर यांनी गुरुवारी ता ३ तडकाफडकी निलंबनाची कारवाई केली आहे .
येथील मोंढा परिसरात असलेल्या जिल्हा परिषद प्रशालेत प्राथमिक पदवीधर शिक्षक असलेल्या दत्ता गंगाधर होगे वय ४५ या शिक्षकाविरुद्ध तक्रार पेटीत इयत्ता आठवीच्या अनेक विद्यार्थिनींनी टाकलेल्या तक्रारीवरून मुख्याध्यापिका यांनी दिलेल्या तक्रारीवरून बुधवारी ता २ येथील पोलीस ठाण्यात पौक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता .
मंगळवारी ता १ सकाळी ११:३० वाजता शाळेत पोलीस स्टेशनच्या निर्भया पथकातील पोलीस अंमलदार शकुंतला चांदीवाले व सय्यद फय्याज यांनी भेट देऊन विद्यार्थ्यांशी सवांद साधला असता इयत्ता आठवीच्या विद्यार्थ्यांनी शाळेतील होगे सराविरुद्ध तक्रार असल्याचे सांगत शाळेतील तक्रार पेटीत तक्रार टाकल्याचे सांगितले . सदरील तक्रार पेटी उघडली असता होगे सराविरुद्ध अनेक तक्रारी सापडल्या होत्या .
या घटनेची चौकशी केल्यानंतर शिक्षण विभागातील वरिष्ठांना माहिती दिल्यानंतर बुधवारी ता २ दुपारी येथील पोलीस ठाण्यात शाळेच्या मुख्याध्यापिका छाया उमाजी गायकवाड वय ५२ रा लोकमान्यनगर परभणी यांचे तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला होता . त्या अनुषंगाने जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी नतीशा माथूर यांनी महाराष्ट्र जिल्हा परिषद सेवा वर्तणूक नियम ३ (१) (ब) नुसार जिल्हा परिषद सेवेतून निलंबित केले असून या कालावधीत त्याचे मुख्यालय पालम पंचायत समिती दिले आहे . दरम्यान या प्रकरणाचा तपास पोलिसांकडून सुरू असून अद्यापपर्यंत त्या शिक्षकाला अटक झाली नसल्याची माहिती हाती आली आहे .