गोखुर खत सर्वांसाठी फायदेशीर : प.पु.मनीषानंद पुरी महाराज
गोखुर खत सर्वांसाठी फायदेशीर : प.पु.मनीषानंद पुरी महाराज
मानवत : रासायनिक खतापेक्षा गोखुर खत अतिशय फायदेशीर असून याचा वापर केल्यामुळे शेती विषमुक्त होऊन अनेक व्याधीपासून बचाव होतो. यामुळे शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर वापर करायला हवा असे आवाहन प.पु. महामंडलेश्वर १००८ स्वामी मनीषानंद पुरी महाराज यांनी केले.
तालुक्यातील रामेटाकळी येथील पसायदान गोरक्षण संस्थेमध्ये आयोजित भूमिपूजन कार्यक्रमप्रसंगी ते बोलत होते. तावेली व्यासपीठावर माजी खासदार गणेशराव दुधगावकर, डॉ. केशवराव सांगळे (उपायुक्त, पशुसंवर्धन विभाग, परभणी), डॉ. नामदेव आघाव, (जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी, परभणी),डॉ. केदार खटिंग, सौ. मंदाताई गंगाधरराव कदम (सरपंच, रामेटाकळी) यांची उपस्थिती होती.
अध्यक्षीय समारोप करताना दुधगावकर यांनी सांगितले की, एखादी योजना राबवताना सार्वजनिक क्षेत्रातील भागीदारी वाढली तर अधिक चांगल्या पद्धतीने यशस्वी होते. अन्यथा शासनाच्या दप्तरी अडकून पडले की अमलबजावणीत अनेक अडथळे येतात.
संस्थेचे सचिव माणिक रासवे यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले की, गोसेवेसाठी रामेटाकळी येथील ग्रामस्थांनी खूप सहकार्य केले. त्यामुळे आतापर्यंत हजारो गायी वाचवता आल्या. गोखुर खतालाही मोठी मागणी असते. संस्थेच्या माध्यमातून गांडूळ खत निर्मिती प्रकल्पाचे भूमिपूजन झाले असून लवकरच पंचगव्य निर्मिती सुरु करण्यात येणार आहे.