गुलाबी थंडीत उदगीर नगरपरिषद निवडणूक रंगधुमाळी; जिव्हाळा ग्रुपच्या सर्व वयोगटातील नागरिकांशी एकमुख न्यूज नेटवर्कचा थेट संवाद
गुलाबी थंडीत उदगीर नगरपरिषद निवडणूक रंगधुमाळी; जिव्हाळा ग्रुपच्या सर्व वयोगटातील नागरिकांशी एकमुख न्यूज नेटवर्कचा थेट संवाद
उदगीर (प्रतिनिधी) उदगीरमध्ये गुलाबी थंडीची चाहूल लागलेली असतानाच नगरपरिषद निवडणुकीची रंगधुमाळीही तापू लागली आहे. याच निवडणूक वातावरणात जिव्हाळा ग्रुपतर्फे आज ज्येष्ठ नागरिकांसह सर्व वयोगटातील नागरिकांशी संवाद साधण्याचा उपक्रम राबविण्यात आला. या संवाद उपक्रमाचे प्रत्यक्ष कव्हरेज एकमुख न्यूज नेटवर्कने करत नागरिकांच्या प्रतिक्रिया आणि मते नोंदवून घेतल्या.
शहरातील स्थानिक प्रश्न, प्रभागनिहाय अडचणी, विकासाच्या गरजा आणि आगामी निवडणुकीबद्दल मतदारांच्या अपेक्षा जाणून घेण्यासाठी हा संवाद आयोजित करण्यात आला होता. संवादादरम्यान नागरिकांनी रस्त्यांची दुरवस्था, पाणीपुरवठ्याचा अनियमितपणा, स्वच्छतेची कमतरता, वाहतूक कोंडी तसेच आरोग्यसुविधांचे प्रश्न स्पष्टपणे मांडले.
एकमुख न्यूज नेटवर्कने घेतलेल्या मुलाखतीत अनेक नागरिकांनी नगरपरिषदेच्या कामकाजाबाबत नाराजी व्यक्त करत, या निवडणुकीत उत्तरदायी आणि विकासाभिमुख नेतृत्वाची अपेक्षा असल्याचे सांगितले.
जिव्हाळा ग्रुपने नागरिकांकडून मिळालेल्या सूचना, तक्रारी आणि अपेक्षा यांची नोंद घेऊन संबंधित प्रभागांमध्ये पुढील स्तरावर पाठपुरावा करण्याची भूमिका स्पष्ट केली. “प्रत्येक नागरिकाचा आवाज प्रशासनापर्यंत पोहोचावा आणि उदगीर शहराचा विकास ठोस मार्गाने व्हावा”, असा उद्देश या संवादातून व्यक्त करण्यात आला.
गुलाबी थंडीची सकाळ असतानाही नागरिकांचा सहभाग उत्स्फूर्त होता. निवडणुकीचे वातावरण तापत असून, एकमुख न्यूज नेटवर्कच्या संवाद मोहिमेमुळे शहरातील खऱ्या प्रश्नांचा आणि नागरिकांच्या आवाजाचा स्पष्ट प्रतिबिंब उमटल्याचे चित्र समोर आले.












































