एनसीसी कॅडेट्सचा पुढाकार : सैनिकी विद्यालयात स्वच्छता मोहिमेला उत्स्फूर्त प्रतिसाद

एनसीसी कॅडेट्सचा पुढाकार : सैनिकी विद्यालयात स्वच्छता मोहिमेला उत्स्फूर्त प्रतिसाद
उदगीर प्रतिनिधी : ज्ञानगिरी कॅम्पस येथील श्री छत्रपती शाहू महाराज सैनिकी विद्यालयात एनसीसी कॅडेट्सने स्वच्छतेचा ध्वज हाती घेत स्वच्छता अभियान राबवले. विद्यार्थ्यांनी वर्गकक्ष, मैदान आणि परिसरातील कचरा हटवून स्वच्छतेबद्दल जनजागृती केली.
“स्वच्छतेतून आरोग्य, आणि आरोग्यातूनच प्रगती” या संदेशासह कॅडेट्सनी शाळा परिसराला नवसंजीवनी दिली. शिस्त आणि जबाबदारीसोबत स्वच्छतेची भावना जपणे हे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य असल्याचे कॅडेट्सनी प्रत्यक्ष कृतीतून दाखवून दिले. एनसीसी प्रमुख डॉ. बालाजी मुस्कावाड यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की, स्वच्छता ही फक्त एक कृती नसून जीवनशैलीचा महत्त्वाचा भाग आहे. हात धुणे, स्वच्छ पाणी पिणे, नियमित आंघोळ करणे, वैयक्तिक स्वच्छता राखणे यामुळे संसर्गजन्य रोगांपासून संरक्षण मिळते आणि विद्यार्थ्यांचे आरोग्य सक्षम राहते. शिक्षण निदेशक गोविंद डिगोळे यांनी विद्यार्थ्यांच्या कामाचे कौतुक करताना म्हटले, “स्वच्छ परिसर म्हणजे निरोगी समाज.
स्वच्छतेची जाणीव लहानपणी निर्माण झाली तर पुढील आयुष्यातही नागरिक जबाबदार राहतात. स्वच्छ भारत अभियान हे केवळ सरकारी उपक्रम नसून प्रत्येकाचा सहभाग आवश्यक असलेली राष्ट्रीय चळवळ आहे.” अभियानादरम्यान क्रीडा शिक्षक शिवकुमार कोळ्ळे, प्रा. शिवाण्णा गंदगे यांच्यासह सर्व शिक्षक व कर्मचारी उपस्थित होते. विद्यार्थ्यांनी उत्साहाने या मोहिमेत भाग घेत स्वच्छतेचा आदर्श घालून दिला.














































