उस्माननगर मध्ये घाणीचे साम्राज्य. सार्वजनिक आरोग्य धोक्यात.
उस्माननगर मध्ये घाणीचे साम्राज्य. सार्वजनिक आरोग्य धोक्यात.
उस्माननगर ( गणेश लोखंडे) – कंधार तालुक्यातील विकसनशील व महत्त्वाचे गाव म्हणून ओळखले जाणारे उस्माननगर येथे पावसाळ्यापूर्वी करण्यात येणारी नालेसफाई, कचरा, उकीरडे, रस्त्यावरील घाण वेळेपूर्वीच स्वच्छता करण्यासाठी ग्रामपंचायत दूर्लक्ष करीत असल्याचे दिसून येत आहे. परिणामी गावकऱ्यांचे आरोग्य धोक्यात येणार असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. प्रशासनाने तातडीने दखल घेऊन स्वच्छतेच्या कामांसाठी लक्ष देण्याची मागणी गावकरी करीत आहेत.
अर्धवट राष्ट्रीय महामार्ग नाली बांधकाम मुळे घाण नालीचे पाणी बसस्थानक पासून गावात शिवमंदिर, महारुद्र मंदीर, बाजार रस्त्यावर वाहत जाते आहे. आरोग्यसेवा देणारे प्राथमिक आरोग्य केंद्र परिसरातील घाणीचे उकीरडे रुग्णांना त्रासदायक ठरत आहेत. गावातील प्रमुख व अंतर्गत रस्त्यावर ठिकठिकाणी कचरा ढीग साचले आहेत.
शासनाने सार्वजनिक स्वच्छता अबाधित राहायला हवी म्हणून गावासाठी सुसज्ज घंटागाडी उपलब्ध करून दिली आहे. फक्त दुर्लक्ष मुळे घंटागाडीचा वापरच केला जात नाही. शासनाने मोठ्या प्रमाणावर निधी देवूनही सार्वजनिक स्वच्छता विषयाकडे गांभीर्याने पाहिले जात नाही. ही वस्तुस्थिती आहे.
उस्माननगर गाव दोन राष्ट्रीय महामार्ग मुळे वेगाने वाढत असताना गावाचे शहरात रुपांतर होत आहे. मोठ्या प्रमाणावर वस्तीवाढ होत आहे. आचारसंहिता कालावधीत गावात वेगवेगळ्या ठिकाणी कामे पूर्ण करण्यासाठी वेळ मिळत असताना केवळ सार्वजनिक स्वच्छतेच्या कामांसाठी अक्षम्य दूर्लक्ष कसे हा प्रश्न गावकरी विचारत आहेत.
लवकरच नवीन शैक्षणिक वर्षात शाळांना सुरवात होईल. गावातील शाळा, पोलीस वसाहत, दवाखाना, गल्लोगल्ली मधील रस्त्यावर साचलेले कचरा ढीग, घाणीने तुडुंब भरलेल्या नाल्याच्या स्वच्छतेच्या कामांसाठी लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे.
ग्रामपंचायत, पंचायत समिती पातळीवर यासाठी तातडीने उपाययोजना करण्यात यावी अशी मागणी गावकऱ्यांनी व्यक्त केली आहे.
__________________