सूचना: "एकमुख" न्यूज पोर्टल कुठल्याही जाहिरातीची पुष्टी करत नाही. कृपया पडताळणी करूनच कोणतेही व्यवहार करा. आम्ही केवळ माहिती पुरवतो, व्यवहारांची जबाबदारी वाचकाची आहे.
Homeराजकारण

उदगीर नगरपरिषद निवडणूक : नामनिर्देशनाचा अंतिम दिवस गजबजलेला;रविवारीच उमेदवारांची मोठी यादी दाखल — आज अंतिम निर्णयाची प्रतीक्षा

उदगीर नगरपरिषद निवडणूक : नामनिर्देशनाचा अंतिम दिवस गजबजलेला;रविवारीच उमेदवारांची मोठी यादी दाखल — आज अंतिम निर्णयाची प्रतीक्षा

उदगीर : उदगीर नगरपरिषद निवडणुकीसाठी रविवारी (दि. १६) मोठ्या प्रमाणावर उमेदवारी अर्ज दाखल झाल्यानंतर आज (दि. १७) अंतिम दिवस असल्याने शहरातील राजकीय हालचालींना आणखी वेग आला आहे. रविवारीच नगराध्यक्ष आणि नगरसेवक पदांसाठी लक्षणीय संख्या अर्ज दाखल झाल्यामुळे निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या कार्यालयात दिवसभर प्रचंड चळवळ पाहायला मिळाली. आज शेवटच्या क्षणापर्यंत आणखी काही उमेदवार अर्ज दाखल करतील, अशी शक्यता आहे.

रविवारी दाखल झालेल्या यादीप्रमाणे नगराध्यक्ष पदासाठी ९ उमेदवारांनी एकूण ११ अर्ज दाखल केले आहेत. यामध्ये विविध पक्षांतील तसेच अपक्ष उमेदवारांचा समावेश आहे. तर नगरसेवक पदांसाठी एकूण ९६ अर्ज प्राप्त झाले असून काही प्रभागांत स्पर्धा अत्यंत चुरशीची होणार हे आता स्पष्ट झाले आहे.

राजकीय वर्तुळात सर्वाधिक चर्चा युती आणि आघाडीबाबतची आहे. भाजप–राष्ट्रवादी (अजित पवार गट) युती व काँग्रेस–राष्ट्रवादी (शरद पवार गट)–उबाठा आघाडी या दोन्हींची अधिकृत घोषणा अद्याप न झाल्याने अनेक दावेदार शेवटच्या क्षणापर्यंत प्रतीक्षेत आहेत. उमेदवारांना कोणत्या गटातून अंतिम हिरवा कंदील मिळणार याबाबत अनिश्चितता असल्याने रविवारी अर्ज ‘बॅकअप’ म्हणून दाखल केल्याची माहिती सूत्रांकडून मिळते.

शिवसेना (एकनाथ शिंदे गट)ने स्वबळावर लढण्याची घोषणा केल्याने निवडणुकीत तिसरा स्वतंत्र पर्याय अधिक बळकट होताना दिसत आहे. काही प्रभागांत शिवसेनेच्या संभाव्य उमेदवारीमुळे मताधिक्याच्या समीकरणात मोठा फरक पडू शकतो, अशी चर्चा आहे.

नामनिर्देशनाचा आज अंतिम दिवस असल्याने अजूनही काही दिग्गज महिला उमेदवारांबाबत संभ्रम कायम आहे. खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी आरक्षित असलेल्या नगराध्यक्षपदासाठी कोणत्या पक्षाचा अधिकृत उमेदवार मैदानात उतरणार, याची शहरात उत्सुकता आहे. रविवारी दाखल झालेल्या उमेदवारांपैकी अनेक जण अधिकृत उमेदवार म्हणून घोषित होतील की काही नव्या नावांचा उदय होईल, हे आज स्पष्ट होणार आहे.

शहरातील मतदार, व्यापारी, सामाजिक संस्था आणि विविध संघटनांचे लक्ष आता निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या कार्यालयावर केंद्रित झाले आहे. आज सायंकाळपर्यंत नामनिर्देशन प्रक्रिया पूर्ण होताच, उदगीर नगरपरिषद निवडणुकीचे प्रत्यक्ष ‘राजकीय चित्र’ स्पष्ट होणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also
Close
Back to top button