उदगीरमधील व्यापाऱ्यांचा संताप उफाळला; फेरीवाल्यांचा प्रश्न न सुटल्यास मतदानावर बहिष्काराचा इशारा ? नगरपरिषद निवडणुकीवर काय परिणाम होणार !

उदगीरमधील व्यापाऱ्यांचा संताप उफाळला; फेरीवाल्यांचा प्रश्न न सुटल्यास मतदानावर बहिष्काराचा इशारा ? नगरपरिषद निवडणुकीवर काय परिणाम होणार !
उदगीर प्रतिनिधी : उदगीर शहरातील मुख्य बाजारपेठेत फेरीवाले, हातगाडीधारक आणि अनियंत्रित वाहतूक या वाढत्या समस्येकडे प्रशासन, नगरपरिषद, नगराध्यक्ष आणि नगरसेवक वारंवार तात्पुरत्या उपायांनी पाहत असल्याचा आरोप करत व्यापारी बांधवांमध्ये नाराजी वाढताना दिसत आहे. गेल्या काही दिवसांपासून शहरातील विविध व्यापारी संघटनांच्या सदस्यांनी आपल्या सोशल मीडिया स्टेटसवर “फेरीवाल्यांचा प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लागेपर्यंत मतदानावर बहिष्कार” अशी भूमिका जाहीरपणे नोंदवली आहे.
व्यापाऱ्यांच्या मते, मुख्य बाजारपेठेत वाढलेली गर्दी, वाहतूककोंडी, अतिक्रमण, तसेच दैनंदिन व्यवसायावर होणारा परिणाम यामुळे व्यापारी वर्ग त्रस्त झाला आहे. अनेकदा तक्रारी, बैठका आणि निवेदनांनंतरही केवळ काही दिवस चालणारे तात्पुरते उपाय करून विषय पुन्हा ढगळ सोडण्यात आल्याने असंतोष वाढला आहे.
या पार्श्वभूमीवर, व्यापाऱ्यांनी मतदानावर बहिष्काराचा दिलेला इशारा लक्ष वेधून घेत आहे. उदगीर नगरपरिषद निवडणुकीच्या तोंडावर शहरातील व्यापारी समुदायाचा हा संभाव्य निर्णय राजकीयदृष्ट्या महत्त्वाचा ठरू शकतो. कारण उदगीरमधील मतदानात व्यापारी समाजाचा घटक निर्णायक मानला जातो. त्यामुळे या प्रश्नाची दखल न घेतल्यास निवडणुकीच्या निकालावरही त्याचा परिणाम होऊ शकतो, अशी चर्चा शहरात सुरू आहे.
व्यापारी संघटनांचे म्हणणे आहे की, “तात्पुरते नाही, कायमस्वरूपी समाधान हवे” — अन्यथा निषेधाची भूमिका कायम राहील. मात्र, अंतिम निर्णय काय होईल, व्यापारी वर्ग खरोखरच मतदानावर बहिष्कार टाकेल की चर्चेनंतर तो मार्ग काढला जाईल, हे आगामी काही दिवसांत स्पष्ट होणार आहे.
उदगीरच्या नागरी व्यवस्थापनावर आणि निवडणुकीच्या समीकरणांवर व्यापारी समुदायाच्या या भूमिकेचा नक्कीच परिणाम दिसू शकतो, असे स्थानिक राजकीय विश्लेषकांचे मत आहे.














































