उदगीरच्या बुद्धविहाराचे आज राष्ट्रपतींच्या हस्ते लोकार्पण: तळघरात १२०० जणांसाठी ध्यान केंद्र
मध्य प्रदेशातील सांची स्तुपाप्रमाणे साकारले प्रवेशद्वार
उदगीरच्या बुद्धविहाराचे आज राष्ट्रपतींच्या हस्ते लोकार्पण: तळघरात १२०० जणांसाठी ध्यान केंद्र
मध्य प्रदेशातील सांची स्तुपाप्रमाणे साकारले प्रवेशद्वार :
उदगीर प्रतिनिधी : कर्नाटक राज्याच्या सीमेवर, महाराष्ट्रातील शेवटचा तालुका असलेल्या उदगीर शहरातील बौध्द उपासकांसाठी २० कोटी रुपये खर्च करुन बुध्दविहाराची उभारणी केली आहे. कर्नाटक राज्यातील कलबुर्गी येथील बुध्द विहाराचे हे लहान रुप असून, या बुध्दविहाराचे प्रवेशद्वार सांची स्तुपाप्रमाणे आहे. ३ हजार ६०० चौरस मीटरचा गाभारा असलेल्या या बुध्दविहाराच्या तळघरात १२०० पेक्षा अधिक उपासकांना ध्यानधारणा करता येईल. सर्व सुविधांनी सज्ज असलेल्या या बुध्दविहाराचे लोकार्पण राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते आज बुधवारी होणार आहे.
उदगीरसारख्या सीमावर्ती भागात राज्याचे क्रीडा मंत्री संजय बनसोडे यांच्या संकल्पनेतून उभारण्यात आलेल्या, या बुद्धविहारात भाविकांसाठी सर्वच सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत. मुख्य संरचनेच्या सभोवतालचे अंतर्गत गाभाक्षेत्र ३६०० स्क्वेअर मीटर आहे. बुद्धविहाराचे विहंगम दृश्य पाहण्यासाठी १० फूट रुंदीच्या मुख्य संरचनेच्या सभोवताली गवताच्या सांध्यावरील पायवाट असलेले खडबडीत शहाबादी फरशांचे फ्लोरिंग तयार केले आहे. तळमजल्यावर १७.८० मिमी व्यासाचा घुमट आहे. यामध्ये १२०० भाविकांसाठी ध्यान केंद्र तयार करण्यात आले आहे.
उपासकांसाठी दिलेल्या सुविधा
१) तीन अंतर्गत प्रवेशद्वार (समोर, उजवीकडे आणि डावीकडे).
२) बाह्य परिघात एक मुख्य प्रवेशद्वार आहे. सांची स्तुपाचे डिझाइन,
३) समोर किंवा बुद्ध विहारात १०० चारचाकी आणि २०० दुचाकींची पार्किंग.
४) बुद्ध विहारासमोर ५०० मीटर लांबीचा दुभाजक असलेला चौपदरी रस्ता.
लोकार्पणासाठी ६०० बसेस : उदगीर येथे होत असलेला बुध्द विहार लोकार्पण सोहळा, तसेच याचवेळी राज्य सरकारच्या वतीने आयोजित केलेल्या महिलांच्या आनंद सोहळ्यासाठी ६०० बसेसची व्यवस्था करण्यात आली आहे. लातूर जिल्ह्यासह, नांदेड आणि परभणी जिल्ह्यातून बसेस मागवण्यात आल्या आहेत. या बसेसच्या माध्यमातून महिलांची ने-आण करण्यात येणार आहे.