हभप समाधान महाराज शर्मा यांची नोव्हेंबरमध्ये उमरीत श्रीराम कथा…
हभप समाधान महाराज शर्मा यांची नोव्हेंबरमध्ये उमरीत श्रीराम कथा.
भव्य कीर्तन महोत्सव, पालखी मिरवणूकीचे आयोजन.
बाबा महाराज संजीवन समाधी शताब्दी सोहळ्यानिमित्त अकरा दिवस धार्मिक कार्यक्रमाची रेलचेल…
11 नोव्हेंबर ते 17 नोव्हेंबर भव्य श्रीराम कथा, किर्तन महोत्सव.
18 नोव्हेंबर रोजी काल्याचे किर्तनआणि 21 नोव्हेंबर रोजी भव्य पालखी मिरवणूक…
उमरी /प्रतिनिधी
उमरी शहरातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री सद्गुरु सदानंद बाबा महाराज संजीवन समाधी शताब्दी सोहळ्यानिमित्त या वर्षी दिनांक 10 नोव्हेंबर ते 21 नोव्हेंबर 2024 दरम्यान विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
दरम्यान श्रीराम कथा, भव्य कीर्तन महोत्सव, पालखी मिरवणूक आदी धार्मिक कार्यक्रम होणार आहेत.
11 दिवस चालणाऱ्या या धार्मिक कार्यक्रमासाठी महाराष्ट्रातील असंख्य भाविक भक्तांची उपस्थिती राहणार आहे.
बाबा महाराज संजीवन समाधी शताब्दी सोहळ्यानिमित्त महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध रामायणाचार्य परमपूज्य हभप समाधान महाराज शर्मा केजकर यांच्या अमृतवाणीतून दिनांक 11 नोव्हेंबर ते 17 नोव्हेंबर 2024 दरम्यान दररोज दुपारी एक ते चार या वेळात भव्य श्रीराम कथा व राञी आठ ते दहा भव्य कीर्तन महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. दिनांक 10 नोव्हेंबर ते 19 नोव्हेंबर दरम्यान बाबा महाराज संजीवन समाधीस वेदमूर्ती विश्वास शास्त्री घोडजकर व योगेश्वर घोडजकर शिष्यवंत यांच्या वतीने सकाळी महारुद्र अभिषेक व सायंकाळी सविवेचन मंत्र जागर आदी कार्यक्रम होणार आहेत. कीर्तन महोत्सवात दिनांक 11 नोव्हेंबर हभप जयेश महाराज भाग्यवंत, दिनांक 12 नोव्हेंबर सोनालीदीदी करपे, दिनांक 13 नोव्हेंबर ह भ प संग्राम बापू भंडारे,दिनांक 14 नोव्हेंबर ह भ प विशाल महाराज खोले, दिनांक 15 नोव्हेंबर ह भ प बाळू महाराज गिरगावकर, दिनांक 16 नोव्हेंबर ह भ प समाधान महाराज भोजेकर, दिनांक 17 नोव्हेंबर ह भ प सोपान महाराज सानप, दिनांक 18 नोव्हेंबर ह भ प समाधान महाराज शर्मा यांचे काल्याचे किर्तन होईल. दिनांक 20 नोव्हेंबर रोजी मतदान असल्याने या दिवसाचे सर्व कार्यक्रम रद्द करण्यात येऊन दिनांक 21 नोव्हेंबर रोजी भव्य पालखी मिरवणूक काढण्यात येणार आहे.
बाबा महाराज संजीवन समाधी शताब्दी सोहळ्यानिमित्त चालणाऱ्या अकरा दिवसीय या धार्मिक कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संजीवन समाधी शताब्दी उत्सव समितीच्या वतीने जोरदार प्रयत्न करण्यात येत आहेत. श्रीराम कथा व कीर्तन महोत्सव गोदावरीबाई मामीडवार नगरात होईल.
जुन्या उमरी भागात श्री सद्गुरू सदानंद बाबा महाराज यांचे संजीवन समाधी मंदिर आहे. या वर्षी संजीवन समाधीला शंभर वर्ष पूर्ण होत असल्याने संस्थानाधिपती अरविंद महाराज यांच्या अधिपत्याखाली अकरा दिवस विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.